बुधवार, ३ जून, २०२०

पावसाळ्यात कोरोना वाहून जाणार की जगणार? काय आहेत जगभरातील तज्ञांचे अंदाज

कोरोना विषाणुच्या संक्रमणामुळे जगभरात लाखो नागरीक बाधित झाले तर हजारो नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह विविध देशांच्या शास्रज्ञांचे कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप त्याला यश आले नाही. मात्र जगभरात कोरोना बाधितांचा आकडा लाखोंच्या संख्येने वाढत चालला आहे. डिसेंबर-२०१९ म्हणजेच ऐन हिवाळ्यात आलेला कोरोना उन्हाळ्यात उष्णतेमुळे नष्ट होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरवातीला पसरल्या होत्या मात्र उन्हाळ्याचा त्यावर कोणताही परीणाम झाल्याचे दिसुन आले नाही याउलट बाधितांची संख्या वाढतच गेली. पावसाळ्यात कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होईल असा अंदाज अनेक तज्ञांनी यापर्वीही व्यक्त केला आहे. यंदा जुनच्या प्रारंभालाच महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र कोरोनाचे काय होईल याची नागरीकांना उत्सुकते बरोबरच चिंता सुद्धा लागली आहे.

कोरोना विषाणू पावसाच्या पाण्यात वाहून जाईल की कोरोना विषाणू वाढण्याला पाऊस कारणीभुत ठरेल याबाबत जगातील शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहेत. त्यात अनेक तज्ञांच्या मते पावसामुळे कोरोनाचा विषाणु मोठ्याप्रमाणात पसरेल तर काहीं तज्ञांनी कोरोना पावसाच्या पाण्यात वाहून जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटीतील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हात-पाय किंवा चेहरा केवळ पाण्याने धुतला तर कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही त्यासाठी आपल्याला हँडवॉश किंवा साबणाचाच वापर करावाच लागेल. मात्र ‘पावसाळ्यात कोरोना व्हायरसचा परिणाम काय आणि कीती होईल याचा अंदाज अद्याप आलेला नाही.

'पावसाच्या पाण्याने कोरोनाचा विषाणू मरणार नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होईलच याची शाश्वती देता येणार नाही' - जेनिफर होर्ने (शास्त्रज्ञ, संसर्गजन्य रोग विभाग, डेलावेअर युनिव्हर्सिटी)

ज्याप्रमाणे धुळीचे कण पावसाच्या पाण्यात वाहून जातात त्याप्रमाणे पावसाळ्यात पडलेल्या पाण्यामुळे कोरोना वाहुन जाईल व त्याचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. - जेई बेटेन (प्राध्यापक, जागतिक आरोग्य, औषध आणि साथीचे रोग वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी)

आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याला आपले हात, पाय किंवा चेहरा हँडवॉशने किंवा साबणाने धुवावेच लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर जगभरातील तज्ञांनी कोरोना विषाणुला रोखण्यासाठी व प्रसार होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टंसिंगसह तोंडाला मास्क या सारख्या नेहमी घेत असलेल्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता जास्त असल्यामुळे कोरोनाचा विषाणु अनेक दिवस हवेत जिवंत राहु शकत असल्याने या विषाणुचा वेगाने प्रसार होऊन संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

निसर्ग खवळला, चक्रीवादळ कुठे-कुठे धडकणार

चक्रीवादळाचा आपल्या जिल्ह्यात काय होणार परिणाम

मुंबई, ता. ३ : 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असताना महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासुुन
 बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन जूनला दुपारी तयार झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाची निर्मिती झाली. सुरुवातीला कमी तीव्रतेने असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे.

'निसर्ग' चक्रीवादळ हे बुधवारी (ता. ०३) दुपारपर्यंत मुंबईलगत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून जमिनीवर प्रवेश करण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी सुमारे ११० ते १२० किलोमीटर या वेगात चक्राकार वारे वाहण्याची शक्यता आहे. या मध्ये मुंबईसह रायगड, ठाणे पालघर तर गोवा, गुजरात च्या काही भागाला याचा तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग वादळाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास मुबंईजवळून नाशिक जळगाव या भागातून जाणार असल्याचा अंदाज आहे.

आपला जिल्हा

मराठवाड्यातील औरंगाबादसह बहुतेक जिल्ह्यांना निसर्ग चक्रीवादळाची सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे दिसून येते मात्र या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार आपल्या सोबत असून, त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

एकीकडे कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून, नागरिकांनी पुढील दोन दिवस घरातच थांबावे घराबाहेर पडू नये तसेच पत्र्याचे शेड उभारलेल्या निवऱ्यात थांबू नका. पिण्याचे पाणी भरून ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका त्यासाठी आकाशवाणी व दूरदर्शनवरील बातम्या पहा. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.

मंगळवार, २ जून, २०२०

तुमच्या मोबाईलमध्ये हे App आहे का? चायनिज मोबाईल App ला टक्कर देण्यासाठी भारतीयाने आणले हे App

कोरोनामुळे जगभरात चीन विरुद्ध अंतोषाची लाट पसरली असताना चीनची उत्पादनांवर प्रतिबंध घालण्याबरोबरच अनेक देशांनी चीनमधील कंपण्यांना त्या देशातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. भारतातील नागरीकांनी सुद्धा त्या देशांची उत्पादने वापरु नये याबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चा घडून येत आहेत. त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या मोबाईलमध्ये आपण अनेक चायनीज Apps वापरत आलो आहे. यामध्ये कोणते मोबाईल App चायनीज व कोणते मोबाईल App चायनिज नाहीत हे अनेकांना माहीत नसते त्यामुळे चायनीज App मोबाईल मधून काढून टाकावे पण माहीती नसल्यामुळे ते काढणे अनेकांना शक्य होत नाही. यावर चांगला उपाय onetuch या App बनविणाऱ्याने आणला आहे. त्यांनी Remove China Apps हे मोबाईल App गुगल प्ले स्टोअर वर आणले आहे. साडेतीन एमबी चे हे App आपण आपल्या मोबाईल मध्ये Install केल्यानंतर SCAN NOW या बटनवर क्लीक केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट असलेले सर्व चायनीज मोबाईल App स्क्रिनवर दिसू लागतात त्यातून आपण ते Application Uninstall करु शकतो. सुरवातील प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या Remove China Apps या Appला वापरकर्त्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. काही दिवसातच हे App इन्टाल करणाऱ्यांचा आकडा पाच दशलक्षाच्या पुढे गेल्याचे पहायला मिळते.

चीन विरुद्धचा रोष कारणीभुत

कोरोना विषाणू चीनच्या चुकीमुळे सर्व जगताला मोठा त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल अमेरीकेसह प्रमुख देश याबद्दल चीनला दोषी धरत आहेत त्याप्रमाणे भारतातही त्याचा परीणाम जाणवत आहे तर दुसरीकडे चीन भारताच्या हद्दीत घुसघोरी करुन कुरापती काढून विस्तारवात जोपासत असतो. सध्या लद्दाख येथे भारत-चीन च्या Line of Actual Control वर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर सुद्धा या Appला वापरकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे मानले जाते.

मोदींनी केले होते आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला संबोधित करताना ग्लोबल सुद्धा कधी लोकल होता व त्या देशातील जनतेने लोकल उत्पादनाचा स्विकार केल्यानेच ते सध्या ग्लोबल बनल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी आत्मनिर्भर बना असे आवाहन केले होते. त्यानंतर या आत्मनिर्भर यावर सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात चर्चा रंगल्या मात्र त्याचा रोख पुर्णपणे चायनीज उत्पादनां विरुद्ध दिसून येत होता. त्यानंतरच वन टच या भारतातील App तयार करणाऱ्याने Remove China Apps ची निर्मीती केली. अल्पावधीतच हे App मोठ्याप्रमाणात वापरल्या गेल्याने भारतीयांमध्ये सुद्धा प्रतिभा असल्याचे दिसुन येते.

Corona update : जिल्ह्यात आज ५५ रुग्णांची वाढ, ५१४ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, ता. ०२ : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) सकाळी आलेल्या अहवालात ५५ जण पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १६४२ झाला आहे. यापैकी १०४९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ५१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दोन जूनला सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (०१), किराडपुरा (०२), चंपा चौक (०१), कटकट गेट (०१), नारळीबाग (०१), गणेश कॉलनी (०१), जवाहर नगर (०३), भीम नगर (०२), हमालवाडी (०१), शिवशंकर कॉलनी (०२), नाथ नगर (०२), ज्योती नगर (०१), फजलपुरा परिसर (०१), मिल कॉर्नर (०१), एन-३ सिडको (०१), एमजीएम परिसर (०१), रोशन गेट (०१) , विशाल नगर, गारखेडा परिसर (०१), एन-सहा संभाजी कॉलनी (०७), समता नगर (०५), अंहिसा नगर (०१), मुकुंदवाडी (०१), विद्या निकेतन कॉलनी (०१), न्याय नगर (०१), बायजीपुरा (०२), संजय नगर, मुकुंदवाडी (०४), विजय नगर (०२), यशवंत नगर, पैठण (०१), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (०१), नेहरु नगर (०१), जुना मोंढा नाका परिसर (०१), इतर ठिकाणी (०३) या भागात कोरानाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

मृतांची संख्या ७९

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा एक जून रोजी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले

सोमवार, १ जून, २०२०

औरंगाबाद जिल्ह्यात 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत कोणते निर्बंध शिथिल होणार

औरंगाबाद, ता. ०१ : कोरोनाला हरविण्यासाठी शासन एक जून ते ३० जून या कालावधीत लॉकडाऊन ५.० म्हणजेच अनलॉक १.० राबवित आहे यामधील नियमावली काय आहेत व कोणकोणते निर्बंध शिथिल होणार व कोणते कायम राहणार हे वाचा सविस्तर
राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३० जून २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) हे मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक ३० जून २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.

औरंगाबाद जिल्हयासाठी एक जून पासून नियमावली व उपाययोजना
रात्रीची संचारबंदी - अत्यावश्यक बाबी वगळता रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यत नागरिकांची हालचाल/आवागमन पुर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
कमजोर व्यक्तींना/गटांना संसर्गापासून संरक्षण
६५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षा खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यआक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देकांनुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.
कन्टेनमेंट झोन-
  • i. सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडुन कन्टेनमेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.
  • ii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्हयाच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेनमेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेनमेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला, झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समुह, गल्ली्, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगांव, गांवाचा समूह, ग्रामपंचायतयांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
  • iii. कन्टेानमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा चालु राहतील. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमण चालु राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्या‍ण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.

निर्बंध शिथील करणे व टप्याटप्याने लॉकडाऊन उघडणे

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कन्टेंनमेंट क्षेत्र वगळता खालील बाबींना निर्बधासह चालू करण्यास परवानगी राहील. ज्या बाबींना यापुर्वी परवानगी देण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार साथरोग नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याससाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मा.मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून वि‍वक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
  • a. अनुज्ञेय असलेल्या कुठल्या ही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
  • b. क्रिडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्या‍साठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
  • सर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
  • i. दुचाकी – केवळ चालक
  • ii. तीनचाकी- चालक व इतर २ प्रवासी
  • iii. चारचाकी- चालक व इतर २ प्रवासी
  • d. सामाजिक अंतर व निर्जतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करुन जिल्हया अंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त ५० टक्कें क्षमतेने करता येईल.
  • e. आंतर जिल्हार बस वाहतूक बंद राहील.
  • f. सर्व बाजार / दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
मनाई आदेशा दरम्यान दिनांक ३० जून २०२० पर्यत प्रतिबंधीत असलेल्यार बाबी खालीलप्रमाणे आहेत -
  • i. सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
  • ii. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक - वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बु्लन्स्, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.
  • iii. रेल्वे प्रवासी वाहतूक व खाजगी विमान सेवा बंद राहतील तथापी स्वतंत्र आदेशाव्दारे परवानगी दिलेल्या बाबी वगळून.
  • iv. सर्व सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
  • v. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.
  • vi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
  • vii. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील. तसेच बस डेपो, रेल्वे स्टे्शन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्याासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
ठराविक व्यक्ती व वस्तुच्या आवागमणास सुनिश्चित करण्यायबाबतचे विशेष निर्देश
  • i. सर्व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती जसे की, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छ्ता कर्मचारी, अॅम्बूलन्स यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराज्यीय आणि आंतर-जिल्हा आवागमनास परवानगी राहील.
  • ii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार आंतरराज्य व आंतर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार, प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या हालचाली नियंत्रित असतील.
  • iii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार श्रमिक विशेष गाड्या चालू राहतील.
  • iv. सर्व रिकाम्या ट्रकसह सर्व प्रकारच्या वस्तू‍ /मालवाहतुकीची आंतरराज्यीय हालचाल करण्यास परवानगी राहील.

  • आरोग्य सेतू अॅपचा वापर

  • i. आरोग्य सेतू अॅपचा वापर हे संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
  • ii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
  • iii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्यक सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.

  • स्थानिक पातळीवर नागरीकांनी स्व.तः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने,औषधालये व कृषि सेवा संबंधीत दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालु राहतील.
MISSION BEGIN AGAIN
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे-
  • ०१. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्याय ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्कावापरणे बंधनकारक आहे.
  • ०२. सार्वजनिक ठिकाणी दोन व्य,क्ती्मधील अंतर किमान सहा फुट ठेवावे. दुकानामध्येच ग्राहकाची संख्याा एकावेळी पाच पेक्षा जास्ता असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार/आस्‍थापना चालक यांचेवर राहील.
  • ०३ मोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.
  • विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक
  • व्यक्तींना परवानगी असणार नाही.
  • ०४ सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या‍ ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील व त्या साठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
  • ०५. सार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्याास मनाई राहील.
  • ०६. पान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.
कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना
  • ०७. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्ते घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
  • ०८. सार्वजनिक आरोग्यय व कुटुंब कल्याण विभागाकडुन निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थाानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्यार ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
  • ०९ सर्व कामाच्याे ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
  • १०. दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.

  • i. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरविणा-या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे चालु राहण्यास परवानगी असेल.
  • ii. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरवित नसलेल्या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे दिलेली सुट व मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर चालु राहण्या‍स परवानगी राहील. तसेच अशी दुकाने संबंधीत महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहतील.
  • iii. सर्व अत्यावश्यक वस्तु/साहित्य व अत्यावश्यक नसलेल्या वस्तु्/साहित्य यांच्या ई-कॉमर्स सेवा चालू राहतील.
  • iv. सद्या चालू असलेली सर्व औद्योगिक केंद्रे कार्यरत राहतील.
  • v. सर्व बांधकामाशी निगडित क्षेत्रातील (सार्वजनिक/खाजगी) कामे सुरु राहतील. तसेच सर्व मान्सुसनपुर्व कामे (सावर्जनिक/खाजगी) सुरु राहतील.
  • vi. घरपोच सेवा देण्यासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
  • vii. ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
  • viii. सर्व शासकीय कार्यालये पाच टक्के किंवा १० व्यक्ती (जे जास्त असेल ते) या तत्वावर चालू राहतील.
  • ix. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
  • i. दुचाकी – केवळ चालक
  • ii. चारचाकी- चालक व इतर दोन प्रवासी
  • x. एखाद्या विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार इतर कोणत्या ही बाबींसाठी परवानगी राहील.
दंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्दा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भा.दं.वि. १८६० चे कलम १८८ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्यांही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे देशाचे अहम भाग्यच सामनातुन स्तुतीसुमने


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांची बरोबरी करणारा आज एकही नेता सध्याच्या घडीला नाही. त्यांच्यात असलेली राष्ट्रकार्याची तळमळ व या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्याचे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून स्तुतिसुमने उधळण्यात आले आहेत. मात्र गेल्या साठ वर्षात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती मागच्या सहा वर्षात सुद्धा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी झालेली परवड ही फाळणीत निर्वासितांची आठवण करून देते. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच अशी स्तुती करताना दुसरीकडे नोटबंदी व लॉकडाऊनच्या काळात ज्यांना नाहक जीव गमवावा लागला ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? अशा कानपिचक्या या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.

सामनाचा संपादकीय लेख

पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाचे संकट नसते तर दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन भारतीय जनता पक्षाने थाटात साजरा केला असता. तरीही समाज माध्यमे व प्रसिद्धीमाध्यमांच्या मदतीने हा पहिला वर्धापन दिन झोकात साजरा केला असे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून दिसते. मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाजप पुढाऱ्यांची विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती गमतीची आहेत. मागील 70 वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या 6 वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले आहे असे श्री. शहा म्हणतात. कोरोना संकटकाळात मोदी हे पंतप्रधान आहेत हे भारत देशाचे भाग्यच म्हणावे लागेल असा बाण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मारला आहे. मोदी यांचा आत्मनिर्भर भारत नेमका कसा घडतो आहे ते या तीन प्रमुख नेत्यांच्या बोलण्यातून दिसते. एकंदरीत असे दिसते की, आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे.

त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले असे सांगितले जाते ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत. श्री. नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत, पण त्यांनी जे सांगितले ते हास्यास्पद आहे. कोरोनाचे संकट जागतिक आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या असताना हिंदुस्थानात लॉक डाऊनच्या काळात दररोज कोरोना टेस्ट क्षमता 10 हजारावरून 1.60 लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज 4.50 लाख पीपीई किटस् बनविल्या जात आहेत. 58 हजार व्हेंटिलेटर्स बनत आहेत. हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही काय? असा प्रश्न डॉ. नड्डा विचारतात. अर्थात याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले गेले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? कोरोना आज आला, त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. डॉक्टरसाहेब, देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच व ती चीनकडून मागवली जात नव्हती.

मागच्या साठ वर्षांत ‘कोरोना’चे संकट नव्हते. त्यामुळे आजच्या इतकी व्हेंटिलेटर्सची गरज नव्हती, पण साठ वर्षांत ‘एम्स’सारख्या वैद्यकीय संस्था, लाखो डॉक्टर्स, सरकारी इस्पितळे, आयसीएमआरसारख्या संस्था निर्माण झाल्या. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या प्रे. ट्रम्प यांनी दमदार आवाजात हिंदुस्थानकडे मागितल्या (कोरोनाशी लढण्यासाठी) त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरू झाले व त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली हे कसे विसरता येईल? मोदी यांनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या हे मान्य. कश्मिरातून ३७० कलम हटवले. तीन तलाक पद्धत बंद केली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यासंदर्भात निकाल दिला. हे सर्व मागच्या सहा वर्षात झाले व त्याबद्दल मोदी सरकारला श्रेय द्यावेच लागेल, पण १९७१ साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ‘फाळणी’चा सूड घेतला ही ऐतिहासिक चूक मानायची की, ऐतिहासिक कार्य? हेसुद्धा समजून घ्यावे लागेल. राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली. म्हणूनच आजचा हिंदुस्थान उभा आहे. ही चूक असेल तर ती कोणत्या मार्गाने तुम्ही दुरुस्त करणार आहात? ज्या ७० वर्षांतील उणीवा सहा वर्षांत दूर झाल्या त्या ७० वर्षांत अटल बिहारी वाजपेयी यांची साडे पाच वर्ष, विश्वनाथ प्रताप सिंग व चंद्रशेखर यांची मिळून दोनेक वर्ष व जनता पक्षाची सव्वा दोन वर्ष आहेत. हा कालखंड वाया गेला व फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल.

वीर सावरकर यांचा अपमान करण्याची घोडचूक मागच्या साठ वर्षांत नक्कीच झाली, पण ही घोडचूक दुरुस्त करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग गेल्या सहा वर्षांत स्वीकारला गेला नाही. सहा वर्षात जे घडवले गेले ते जगासमोर आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेचे पानिपत झाले. गरिबी वाढली. रोजगार संपला. प्रत्येक चार माणसामागे आज एकजण बेकार आहे. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढून आणि विकून आर्थिक सुधारणांचा डांगोरा पिटला जात आहे. एअर इंडियासारख्या राष्ट्रीय कंपन्या कधीही जमिनीवर कोसळतील. कश्मिरातील तणाव ३७० हटवूनही संपलेला नाही. सिक्कीम आणि लडाखच्या सीमेवर चीनचे सैन्य आमच्या छाताडावर बंदुका ताणून उभे आहे. नेपाळसारखे मुंगीइतके राष्ट्र आमच्या भूभागावर हक्क सांगत आहे. हे काही आत्मनिर्भर मजबूत असल्याचे लक्षण नाही. पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

Corona update : जिल्ह्यात आज २६ रुग्ण वाढले


औरंगाबाद, ता. ०१ : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात सोमवारी (ता. एक) सकाळी आलेल्या अहवालात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५६९ झाली आहे.

कोरोना बाधित रुग्ण कोणत्या परिसरात आढळले ते पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : नवी वस्ती, जुना बाजार (०२), चिस्तीया कॉलनी (०२), उस्मानपुरा (०१), एन आठ सिडको (०२), भवानी नगर (०४), शिवशंकर कॉलनी (०१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (०२), आझम कॉलनी (4), एन सहा सिडको (1), युनूस कॉलनी (०१), मुकुंदवाडी (०१), मिसरवाडी परिसर (०१), नारेगाव (०१), रेहमनिया कॉलनी (०१), वैजापूर (०२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १३ महिला आणि १३ पुरुषांचा समावेश आहे.

एकूण १५६९ रुग्णांपैकी रविवारपर्यंत (ता. ३१) १०२९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ७२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोरोना मीटर
एकूण रुग्ण १५६९
बरे झाले १०२९
मृत्यू ७२
उपचार सुरु ४६८

रविवार, ३१ मे, २०२०

Corona update :

आज दुपारनंतर तीन पॉझिटिव्ह,दोघांचा मृत्यू तर ५३ रुग्ण बरे


औरंगाबाद, ता. ३१ : जिल्ह्यात आज दुपारनंतर तीन रुग्णांची भर पडल्याने दिवसभरातली संख्या ४५ झाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज ५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने तर ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या आकडेवारीत सकाळी ४२ तर दुपारनंतर तीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १५४३ झाला आहे. आतापर्यंत एकूण १०२९ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडले तर आज दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७२ झाला आहे. सद्यस्थितीत ४४२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज कोरोनाबाधित रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (०४), कैलास नगर, गल्ली क्रमांक-२ (०३), एन-६ सिडको (०३), जाफर गेट, जुना मोंढा (०१), गल्ली क्रमांक १७, संजय नगर, मुकुंदवाडी (०१), गल्ली क्रमांक चार रहीम नगर, जसवंतपुरा (०१), व्यंकटेश नगर, जालना रोड (०१), समता नगर (०१), नवीन बायजीपुरा (०१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (०१), देवळाई परिसर (०१), नाथ नगर (०१), बालाजी नगर (०१), हमालवाडी (०१), जुना बाजार (०२), भोईवाडा (०१), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (०२), सुराणा नगर (०१), अझम कॉलनी (०१), सादात नगर (०१), महेमुदपुरा, हडको (०१), निझामगंज कॉलनी (०१), शहागंज (०१), गल्ली क्रमांक २४ संजय नगर (०१), बीड बायपास रोड (०१), स्वप्न नगरी (०१), इतर (०२), दुपारनंतर चंपा चौक (०१), शताब्दी नगर (०१), इतर (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि १९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) आज ३१ मे रोजी ६२ वर्षीय महिला व जुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६१, खासगी रुग्णालयात १०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण ७२ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. 

Corona update

जिल्ह्यात रुग्णांची वाढ काही थांबेना,

आज ४२ रुग्णांची वाढ


औरंगाबाद, ता. ३१ : जिल्ह्यात आज तब्बल ४२ कोरोना बधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या १५४० तर ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या आकडेवारीत ४२ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १५४० वर पोचला आहे. यापैकी ९७६ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७० झाला आहे. तर ४९४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज कोरोनाबाधित रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (०४), कैलास नगर, गल्ली क्रमांक-२ (०३), एन-६ सिडको (०३), जाफर गेट, जुना मोंढा (०१), गल्ली क्रमांक १७, संजय नगर, मुकुंदवाडी (०१), गल्ली क्रमांक चार रहीम नगर, जसवंतपुरा (०१), व्यंकटेश नगर, जालना रोड (०१), समता नगर (०१), नवीन बायजीपुरा (०१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (०१), किराडपुरा (०३), पिसादेवी रोड (०१), बजाज नगर (०१), देवळाई परिसर (०१), नाथ नगर (०१), बालाजी नगर (०१), हमालवाडी (०१), जुना बाजार (०२), भोईवाडा (०१), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (०२), सुराणा नगर (०१), अझम कॉलनी (०१), सादात नगर (०१), महेमुदपुरा, हडको (०१), निझामगंज कॉलनी (०१), शहागंज (०१), गल्ली क्रमांक २४ संजय नगर (०१), बीड बायपास रोड (०१), स्वप्न नगरी (०१), इतर ठिकाणी (०२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २४ महिला आणि १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीत एकाचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा ३० मे रोजी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर खासगी रुग्णालयात १०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण ७० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

काल सायंकाळपर्यंत ११ रुग्णांची भर

सकाळी २८ तर सायंकाळी ११ बाधित रुग्णांची भर पडल्याने शनिवारी (ता. ३०) बधितांची संख्या ३९ झाली होती.

शनिवार, ३० मे, २०२०

रावसाहेब दानवेंनी खरंच हर्षवर्धन जाधव यांना त्रास दिला असेल का?



केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात जे काही कौटुंबिक वाद आहेत त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. डॅशिंग नेता म्हणून हर्षवर्धन जाधव यांचे कौतुक होत असताना काल मात्र आपल्या कुटुंबातील वाद असा नाटकीयरित्या व्हिडिओ बनवून जगाच्या चव्हाट्यावर आणून जाधव यांनी स्वतःचीच इज्जत कमी करून घेतली आहे. महाराष्ट्र जेवढा रावसाहेब दानवे यांना ओळखतो त्यावरून ते सहानुभूतीसाठी केलेल्या स्टंटला काही भडक प्रतिक्रिया देतील असे वाटत नाही.

ज्यावेळी अजित दादांनी केवळ एक दिवस आपला पक्ष न सोडता बंड केले होते त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पार घसरलेली जंत पिलावळ आज सकाळपासून ह्या विषयावर मात्र चवीने बोलत आहे. एवढा निर्लज्जपणा आणता कुठून बाबांनो? काय तो तुम्हाला तुमचे जाणते साहेबच पुरवतात?

वाद प्रत्येक पक्षातील बऱ्याच राजकीय कुटुंबांमध्ये आहेत मात्र ठळक व प्रमुख व्यक्तींच्या घरातले वाद जरा जास्त चवीने व त्या वादाशी काडीमात्र संबंध नसलेले लोकच जास्त चघळतात. स्वतःला 'जबाबदार' वगैरे म्हणवून घेणाऱ्या समाजाचे हेच काय ते वास्तव आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कोणताही कौटूंबिक वारसा नसताना ते स्वकर्तुत्वावर लोकप्रिय झाले आहेत. संघर्षातून वर आल्याने सामाजिक वास्तवाचे त्यांना भान आहे. किती ही मीम बनविले किंवा चेष्टा होत असली तरी रावसाहेब दानवे हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत हे नाकारता येत नाही.

जय हिंद
-----------
लेखक - रोहित पुंक

Corona update : जिल्ह्यात आज २८ रुग्णांची वाढ

औरंगाबाद, ता. ३० : जिल्ह्यात सकाळी २८ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍१४८७ झाली आहे. यापैकी ९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना बाजार (०२), मुझफ्फर नगर, हडको (०१), व्यंकटेश नगर (०१), सुराणा नगर (०२), नारळी बाग (०२), शिवशंकर कॉलनी (०२), हमालवाडी (०१), न्यु वस्ती जुनाबाजार (०१), भवानी नगर, जुना मोंढा (०५), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (०१), शिवाजी नगर (०१), उस्मानपुरा (०४), रेहमानिया कॉलनी (०१), रोशन गेट परिसर (०२), नारेगाव परिसर (०१), न्याय नगर (०१) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिला रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवार, २९ मे, २०२०

खासदाराने केली आमदाराची कटिंग




खासदाराने आमदाराचे केशकर्तन करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. आहे. कोण आहे ते आमदार खासदार हे पहा व्हिडीओमध्ये.

याबाबत माहीती अशी की, नेहमीच वेगवेगळ्या कृतीतून चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या पती म्हणजेच आमदार रवी राणा यांचे केस स्वत: घरीच कापल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

यावरुन त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली असताना त्यांनी केलेल्या या कृतीचे सोशल मिडीयावर कौतुकाची झाप पडली आहे. कोस कापतानाही त्यांनी आमदार जरी केल खासदाराचे केस कापत असला तरी काही चुकी झाल्यास माफ करावे अशी मिश्किल टिप्पणी केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

केस कापतांना त्यांनी एकप्रकारे धावते समालोचन केले. यावेळी बोलताना अनेक ठिकाणी बैठकीला जाताना वाढलेले केस चांगले दिसत नाही त्यामुळे मी रवीजींना बऱ्याचदा केस कापण्याचे सांगत होते की, एखाद्या बार्बरला बोलावून केस कापून घ्या मात्र ते ऐकत नव्हते. त्यामुळे मीच म्हणजे एक खासदार एका आमदाराचे केस कापणार आहे. यानंतर केस कापल्यानंतर आमदार बैठकीला जाऊ शकतील की घरीच बसावे लागेल हे पहावे लागेल' असंही त्या गंमतीने म्हणाल्या.

Corona update :

जिल्ह्यात आज तब्बल ४६ रुग्णांची वाढ, एकूण ४८४ रुग्णांवर उपचार सुरू



औरंगाबाद, ता. २९ : जिल्ह्यात आज ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊन एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९०१ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (०१), कैलास नगर, माळी गल्ली (०१), एन सहा सिडको (०१), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (०२), कैलाश नगर (०१), श्रीनिकेतन कॉलनी (०१), खडकेश्वर (०१), उस्मानपुरा (०१), खंडोबा मंदिर, सातारा गाव (०२), इटखेडा (०३), उस्मानपुरा (०३), जुना बाजार (०१), विश्रांती कॉलनी एन-२ (०३), नारळी बाग गल्ली नंबर दोन (०१), राशेदपुरा, गणेश कॉलनी (०१), शिवशंकर कॉलनी, गल्ली नंबर एक (०१), बायजीपुरा गल्ली नंबर (०१), एन-४ विवेकानंद नगर,सिडको (०१), शिवाजी नगर (०१), एन-६ संभाजी कॉलनी (०१), गजानन नगर एन-११ हडको (५), भवानी नगर, जुना मोंढा (०१), जुना बायजीपुरा (०२), किराडपुरा (०१), रोशनगेट (०१), राशीदपुरा (०१), मोतीवाला नगर (०१), दौलताबाद (०२), वाळूज सिडको (०२) व राम नगर, कन्नड (०३) या भागातील कोरानाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्ण आहेत.

कोरोना मीटर
एकूण रुग्ण १४५३
बरे झाले ९०१
मृत्यू ६८
उपचार सुरू ४८४

गुरुवार, २८ मे, २०२०

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी Facebook Live


https://www.facebook.com/DIOAuranagabd/videos/1121120694915754/
औरंगाबाद, ता. २८ : औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी (ता. २७) फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देत लॉकडाऊनच्या काळात विवाह समारंभ व उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने सुरु करावे याबद्दल काय सुचना केल्या ते पहा.
Link
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी Facebook Live

जिल्हाधिकारी उदय चौधरी आज साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद


औरंगाबाद, ता.२८ : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना आणि त्या घेण्यात येत असलेली खबरदारी याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज २८ मे रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत जनतेशी प्रथमच Facebook LIVE स्वरूपात संवाद साधणार आहेत. तेव्हा नागरिकांनी त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी उदय चौधरी https://www.facebook.com/DIOAuranagabd  आणि https://www.facebook.com/mukund.chilwant.98  या दोन फेसबुक लिंकवरून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

Corona update : जिल्ह्यात आज ३५ रुग्णांची वाढ


औरंगाबाद, ता. २८ : जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली तर बरे होणाऱ्या रुग्णामध्ये वाढ झाल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ५०१ झाली आहे.
  आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (०१), मिसारवाडी (०१), वाळूज महानगर एक, बजाज नगर (०१), संजय नगर (०१),  शहागंज (०१),  हुसेन कॉलनी (०१), कैलास नगर  (०१), रोकडिया हनुमान कॉलनी (०२), उस्मानपुरा (०१), इटखेडा (०१), एन-४ (०३), नारळीबाग (०२), हमालवाडी (०४), रेल्वे स्टेशन परिसर (०२), सिटी चौक (०१), नाथ नगर (०१), बालाजी नगर (०१), साई नगर एन-६ (०१), संभाजी कॉलनी, एन-६ (०२), करीम कॉलनी रोशन गेट (०१) अंगुरी बाग (०१), तानाजी चौक, बालाजी नगर (०१), एन-११ हडको (०१), जय भवानी नगर (०२), अन्य (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १४ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना मीटर
एकूण १३९७
बरे झाले ८३१
मृत्यू ६५
उपचार सुरु ५०१

बुधवार, २७ मे, २०२०

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, जुनच्या पहील्या आठवड्यात होणार नव्या तारखा जाहीर


नवी दिल्ली, ता. २७ : दहावी-बारावीच्या राहीलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सीबीएसई बोर्ड जुनच्या पहील्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन मुळे जे विद्यार्थी आपल्या गृह जिल्हा किंवा राज्यात गेले आहेत त्यांना आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची सवलत मिळणार असल्याची माहीती केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी दिली.

कोरोनामुळे सर्वच शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्याप्रमाणे सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुद्धा लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षा होतील की नाही या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबत सीबीएसई बोर्डाने सुचना मागविल्या होत्या. आलेल्या सुचनांनुसार बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करुन केंद्रीय बोर्डाने विद्यार्थी आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला माहीती देऊन आपण आहे त्या जिल्ह्यात परीक्षा देऊ ईच्छितो याबद्दल सीबीएसई बोर्ड निर्णय घेईल व जुनच्या पहील्या आठवड्यात याबद्दल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणाची माहीती मिळेल असेही श्री. पोखरीयाल यांनी सांगितले. या परीक्षा १ ते १५ जुलैच्या मध्ये होण्याची शक्यता आहे.

नेपाळची अखेर माघार, भारताचा भुभाग दाखविला होता आपल्या नकाशात


नवी दिल्ली, ता. २७ : भारताचा काही भुभाग आपल्या नकाशात दाखविल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेनंतर नेपाळने अखेर माघार घेतली. या प्रकाराने भारताच्या मुत्सुद्देगिरीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे.

एकीकडे लद्दाखच्या सिमेवर भारत आणि चीनचे संबंध ताणले गेल्यानंतर नेपाळ सरकारने भारतीय हद्दीतील कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हा भुभाग नेपाळच्या नव्या नकाशात दाखविला होता. त्यानंतर दोन्ही देशामध्ये राजकीय व परराष्ट्रसंबंधामध्ये कटुता निर्माण झाली होती. भारताच्या वतीने विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही विनंती करतो की, नेपाळ सरकारने अशाप्रकारचे बनावट कार्टोग्राफीक प्रकाशित करु नये व भारताच्या क्षेत्रीय अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर करावा. दरम्यान, घटना दुरुस्तीद्वारे प्रकाशित केलेला नकाशा देशाच्या संविधानात जोडण्याचा प्रस्ताव नेपाळच्या संसदेत मांडण्यात येणार होता. मात्र भारताचा रोष न ओढावता भारतासोबत द्विपक्षीय चर्चेतून हा मुद्दा सोडवावा असे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सुचविल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सहमतीने घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कामकाजातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हा वाद टाळून भारताबरोबरच नेपाळनेही मुत्सद्देगिरी दाखवून दिली.

पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी- योगेश हराळ

निल्लोड (ता. सिल्लोड) : सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिक दाखविताना कृषी सहायक योगेश हराळ सोबत शेतकरी.

औरंगाबाद, ता. २७ : निल्लोड (ता. सिल्लोड) येथे कृषि विभागामार्फत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिके बुधवारी (ता. २७) घेण्यात आली. बियाणांची उगवण क्षमता तपासुन पेरणी करावी असा सल्ला कृषि सहाय्यक योगेश हराळ यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

सोयाबीन हे स्वपराग सिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वानांचे आहे. दरवर्षी बदलाची आवश्यकता नाही. शेतकर्‍यांनी हे बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणीत बियाणांपासून उत्पादीत बियाणांची चाळणी करुन चांगल्या प्रतिच्या बियाणांची निवड करावी. उगवण क्षमतेनुसार पेरणी करता बियाणांचे प्रमाण ठरविता येऊ शकेल. यासाठी तीन पध्दती देण्यात आल्या आहेत. मातीमध्ये उगवण क्षमता तपासावी, कुंडीत बियाणे तपासावे, वर्तमानपत्राचा कागद वापरुन बियाणाची तपासणी करावी. उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी प्रमाणात असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावेत. जीवाणू संवर्धके व बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करुन ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी असा सल्ला कृषि विभागामार्फत दिला आहे.

तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्याक्षिक घेण्यात आली. या कार्यक्रमास कृषि सहायक विठ्ठल गोराडे, कृषिमित्र रविंद्र मगर, सुभाष आहेर, गिरजाराम खटाळ,  संतोष सहाणे आदी शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावली सहकारी पक्षांची बैठक, शरद पवार राहणार हजर


मुंबई, ता. २७ : राज्यात सुरू असलेल्या राजकीय  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आघाडीच्या पक्षांची बैठक बोलावली आहे.

 वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा वाढता आलेख व राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधीसह आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानंतर बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. 

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख