मंगळवार, ९ जून, २०२०

राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकामार्फत सणसणीत प्रतिउत्तर

 
मुंबई  : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर एका शिवसैनिकाची पोस्ट टाकून उत्तर दिले आहे. भाजप नेते राजनाथ सिंह यांनी काल शिवसेनेवर आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली एक सर्कस चालू आहे. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. निवडणुकीच्या अगोदर भाजप आणि शिवसेना एकत्र लढले परंतु निवडणूकीनंतर शिवसेनाला सत्तेचा मोह झाला. सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. भाजपाने हा धोका पचवला. आम्ही धोका पचवणाऱ्यांपैकी आहोत धोका देणारे नाही. धोका देणे ही भाजपाची संस्कृती नाही.

याला उत्तर देताना अक्षय काळे या शिवसैनिकाची पोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केली पोस्टमध्ये म्हटले आहे की, आता राजनाथ सिंह यांनी राजकारण चालू केलंच आहे तर आम्ही सुद्धा काही बोलू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्रात सर्कस चालू आहे? कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाविकासआघाडीचे सरकार खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करत आहेत. योग्य त्या उपाययोजना करून कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी जिद्दीने लढत आहेत आणि राजनाथ सिंह यांना ही सर्कस वाटते? हजारो लोक कोरोनाशी झुंज देत आहेत, महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि असे हजारो जण जिवाचं रान करत आहेत ही गोष्ट राजनाथसिंह यांना सर्कस वाटते? असं असेल तर तुमच्या विचारांना साष्टांग दंडवत! राजकारण करायचं असेल तर आम्ही देखील बोलू शकतो हे विसरू नका.

केंद्र सरकारने काय केलं? टाळ्या वाजवायला लावल्या, थाळ्या वाजवायला लावल्या, नंतर दिवे लावायला लावले. देशात कोरोनाचा पहिला बाधित रूग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकारने नमस्ते ट्रम्प कार्यक्रम ठेवला. कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती का? बरं ठीक आहे एकवेळ असं समजू की राज्यातील आकड्यांना राज्य सरकार जबाबदार आहे. मग देशाचा कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांच्या आसपास गेला त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे असंच म्हणावं लागेल? इटलीमध्ये कोरोनाचे अडीच लाख रूग्ण झाले तेव्हा तिथले पंतप्रधान अक्षरशः रडले. आपल्या देशात दोन लाख ७० हजार रूग्णसंख्या झालेली असताना देशाचे पंतप्रधान किंवा त्यांचा पक्ष बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तयारीला लागला? लाज वाटत नाही का?

बरं दुसरा मुद्दा शिवसेनेने भाजपला धोका दिला? आता हा विषय खुप जुना झाला आहे आणि याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही पण राजनाथ सिंह हे राज्यात त्यांचा पक्ष विरोधी पक्षात बसल्याच्या धक्क्यातून आत्ताशी सावरले आहेत वाटतं त्यामुळे एवढ्या उशीरा प्रतिक्रिया देत असावेत. तर बोलायचा मुद्दा हा आहे की कुणी कुणाला धोका दिला हे महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने उघड डोळ्यांनी बघितलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी समसमान जागावाटप आणि समसमान अधिकार हा शब्द देऊन ऐनवेळी कुणी दगाबाजी केली हे सर्वांनी बघितलं आहे. समसमान जागावाटप तर केले नाहीच उलट शिवसेना उमेदवारांच्या विरोधात ४० ठिकाणी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आणि त्या बंडखोर उमेदवारांना छुपी ताकद दिली. बरं तुम्ही एवढ्यावरच थांबले नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने तुमचा दगाबाजीचा प्लॅन फसला आणि तुमची गाडी १०५ वर थांबली. युतीची पहिली बैठक बसत नाही तोपर्यंतच देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाच वर्ष मुख्यमंत्री मीच राहील. चंद्रकांत पाटील म्हणाले की गृहमंत्री, महसूल मंत्री, अर्थमंत्री, नगरविकास खाते हे आमच्याकडेच राहतील? दिलेला शब्द न पाळुन शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला म्हणून शिवसेनेने इतर पर्यायांचा विचार केला.

राजनाथ जी, तुम्ही सर्वात मोठं हास्यास्पद बोललात की भाजप धोका पचविणाऱ्यांपैकी आहे धोका देणाऱ्यांपैकी नाही. तुमच्या या वाक्यावर लहान मुल सुद्धा हसेल. शिवसेनेला सत्तेचा मोह झाला? तुम्ही धोका देत नाही? मग भल्या पहाटे अजित पवारांसोबत गुपचूप जाऊन शपथविधी सोहळा उरकला ते काय होतं? अख्खी कॉंग्रेस राष्ट्रवादी रिकामी करून स्वत:च्या पक्षात सामावून घेतली आणि तुम्ही धोका देत नाही म्हणता? बरं शिवसेनेला सत्तेचा मोह झाला होता तर तुम्हाला झाला नव्हता का? तसं होतं तर द्यायचं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पद काय बिघडणार होत? २५ वर्षांपासूनचा मित्रपक्ष होता, १० वर्षातले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला का नकार दिला?

कसंय ना राजनाथ जी, तुम्हाला फक्त आणि फक्त सत्ता हेच एकमेव ध्येय दिसतं, तुम्ही काळाबाजार करून आमदार फोडून किती राज्यात काय काय लफडे केले ते उभ्या देशाने बघितले आहेत. त्यामुळे तुम्ही दगाबाजी वगैरे या गोष्टी बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. ते म्हणतात ना 'सौ चुहे खाके बिल्ली चली हे को' अगदी तसं. राहिला विषय महाराष्ट्राचा तर शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करने, गृहीत धरने, फडणवीसांचा सत्तेचा मोह, मी पणा, अहंकार, सत्तेची मस्ती या गोष्टींमुळे तुम्ही विरोधात बसले आहात आणि हो धोका देणं शिवसेनेच्या रक्तात नाही. आजपर्यंत अशी एकही घटना घडली नाही ज्यात शिवसेनेने मित्राला धोका दिला. उलट महाराष्ट्रात शिवसेनेला २५ वर्ष साथ दिलेल्या मित्राने धोका दिला. त्यामुळे विनाकारण राजकारण करू नका. महाराष्ट्र राज्यात महाविकासआघाडीचं नवीन सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. वेगवेगळ्या सर्वेमधून आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मिळणाऱ्या पाठिंब्यातुन जनतेलाही हे सरकार किती योग्य वाटते आहे ते दिसुन आलेलं आहे. राज्य सरकार कोरोनाशी खंबीरपणे लढत आहे. तुम्ही तुमच्या केंद्र सरकार कडे लक्ष द्या आणि निवडणुकींच्या प्रचार बाजूला ठेवून कोरोनाच्या विषयावर लक्ष द्या.

अशाप्रकारे पोस्ट मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख