शुक्रवार, १० जुलै, २०२०

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी

सिल्लोड
: सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा नसता कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा उपविभागीय कृषी अधिकारी यांना शुक्रवारी (ता.१०) निवेदनाद्वारे दिला. 

सिल्लोड- सोयगाव दोन्ही तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडला असुन खरीप पीक अत्यंत चांगले आलेले आहे परंतु युरिया खताच्या टंचाईमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज रोजीपर्यंत तालुक्यात कुठेही युरिया शिल्लक नाही. कोणत्याही दुकानात युरिया उपलब्ध नसल्यामुळे शेतात आलेले चांगले पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिल्लोड तालुक्यातील युरियाची मागणी १७ हजार ५०० टन इतकी आहे. मात्र आज रोजी सिल्लोड तालुक्यात फक्त सहा हजार टन इतकाच युरिया आलेला आहे. उर्वरित ११ हजार ५०० टन युरियाची गरज आहे तर सोयगाव तालुक्यातील युरियाची मागणी चार टन इतकी असताना आतापर्यंत सोयगाव तालुक्यात केवळ एक हजार टन युरिया आलेला आहे. उर्वरित तीन हजार टन युरियाची गरज आहे. दोन्ही तालुक्यात १४ हजार ५०० टन युरियाची गरज आहे. तरी त्वरित आपल्या स्तरावर युरिया उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्ते दोन्ही तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा निवेदनात दिला आहे.

या निवेदनावर भाजपा प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, गणेश लोखंडे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनिल मिरकर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, तालुकाध्यक्ष पुंजाराम गरुड, जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुढाळ, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, तालुका सरचिटणीस किरण पवार, राजेंद्र दांडगे, नारायण खोमणे, भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर गवळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय वानखेडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष दिलीप गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शासनाने शेतकऱ्यांना बांधावर खत देण्याची घोषणा केली मात्र दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर खत तर सोडा दुकानात सुद्धा खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जर बांधावर खत दिले असेल तर त्या शेतकऱ्यांची नावे द्या : इद्रिस मुलतानी, प्रदेश चिटणीस भाजपा

गुरुवार, ९ जुलै, २०२०

शेतकऱ्यांना विनाअट पीककर्ज द्यावे सिल्लोड भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन


सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी अडवणुक केली जात आहे,  शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला असून, विनाअट शेतकऱ्यांना पिककर्ज देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी (ता. नऊ) दिले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन जळगावहून औरंगाबादला जात असतांना त्यांनी शहरातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करीत निवेदन दिले. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव मिळाला नाही यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शासनाने कर्ज माफी दिली; परंतु बँकाकडून त्यावरील व्याज वसूल करण्यात येत आहे. शिवाय कागदपत्रांची पूर्तता मोठी डोकेदुःखी ठरत आहे. बँकांनी विनाअट पिककर्ज द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, गणेश लोखंडे, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल मिरकर,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस  मकरंद कोर्डे, माजी सभापती अशोक गरुड, विजय वानखेडे, अनिल खरात मंगेश सोहनी, दादाराव आळने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवार, ७ जुलै, २०२०

सिल्लोड भाजपची तालुका कार्यकारिणी जाहीर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे यांनी केल्या नियुक्त्या


सिल्लोड : भारतीय जनता पार्टी सिल्लोड तालुका नूतन कार्यकारिणी व विविध मोर्चे व आघाड्याचे अध्यक्षांची नियुक्ती केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या मान्यतेने मंगळवारी (ता. सात) सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा तालुका कार्यकारिणी पुढिल प्रमाणे
उपाध्यक्ष : सांडु पाटील लोखंडे, पिंपळदरी, संजय अपार मादणी, राजाराम पालोदकर घाटानांद्रा, चंद्रशेखर साळवे वांगी बु, गणेश भुमकर सिल्लोड, जमील देशमुख डोंगरगाव, विकास मुळे केळगाव, द्वारकाबाई कारभारी काटकर लोणवाडी,  अंबादास सपकाळ लिहाखेडी.

सरचिटणीस : किरण पवार सिल्लोड, नारायण खोमणे भराडी, विश्वनाथ पाटील उंडणगाव, राजेंद्र दांडगे जळकीबाजार, दिगंबर मोरे घाटनांद्रा,

चिटणीस : विठ्ठल वानखेडे, पानवढोद बु, 
रोहिणी संजय बिरारे अजिंठा, सोमिनाथ सोनवणे सारोळा, भाऊसाहेब बडक पळशी, आजीनाथ भिंगारे केऱ्हाळा, दिलीप मोरे आमठाणा, रणजितसिंह सुर्यवंशी मुखपाठ, कल्याण बरवाल बोरगाव वाडी,  कोषाध्यक्ष:- अरुण काळे शिवना

सिल्लोड भाजपा शहराध्यक्ष : कमलेश कटारिया, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर गवळे हळदा, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष अरुण राठोड सिल्लोड, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष संगीताताई पांडव भराडी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष दिलीप गवळी अन्वी, भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष आत्माराम पाडळे शिवना, भाजपा विमुक्त जाती भटक्या जमाती आघाडी, तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल बकले चिंचखेडा, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पुंजाराम गरुड देऊळगाव बाजार, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष तारेक चौऊस अजिंठा, भाजपा सहकार आघाडी तालुकाध्यक्ष रघुनाथ तायडे अंधारी, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुधाकर सोनवणे सिल्लोड, भाजपा विधी आघाडी तालुकाध्यक्ष अँड विजय मंडलेचा सिल्लोड, वैद्यकीय सेल डॉ. भाऊसाहेब सोळुंके अजिंठा, भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष संतोष गव्हाणे बोदवड.

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार अति उत्कृष्ट पणे काम करीत आहे राज्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोध पक्ष म्हणून भाजपा राज्यात भरीव कामगिरी करीत आहे तोच वारसा तालुक्यात या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी पक्ष संघटन मजबूत करून पक्ष्याची ध्येय धोरण तळागाळात व प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचवतील यात कुठलीही शंका नाही असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे यांनी केले व
सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शनिवार, ४ जुलै, २०२०

इद्रीस मुलतानी यांची भाजपाच्या प्रदेश चिटणीस पदी निवड


सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे. शुक्रवारी (ता. तीन) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली त्यात इद्रीस मुलतानी यांची निवड झाली.
मुलतानी यांच्या कारकिर्दीची सुरुवात सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदापासून झाली, या पदावर असताना जनसमान्यांशी असलेला जनसंपर्क वाढत गेला व भाजपाच्या नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वी सांभाळल्या. यानंतर भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा चिटणीस, प्रदेश चिटणीस अल्पसंख्याक आघाडी, पंचायत समिती सदस्य सिल्लोड, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, उपसभापती पंचायत समिती, आदी पदावर काम केलेले आहे, मुलतानी यांचे वडील भाजपाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्या प्रेरणेने इद्रीस मुलतानी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे अत्यंत विश्वासु म्हणूनच पक्ष संघटनेत ओळख निर्माण केली. प्रशासकीय कामांचा अनुभव व नियोजनाचा हातखंडा असल्याने अनेक निवडणूकीमध्ये नियोजनाची व प्रचाराची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळली आहे. सतत पक्षसंघटनेतील कामात अग्रेसर असणारे इद्रीस मुलतानी आज जिल्ह्याचा चेहरा म्हणून मराठवाड्यात व महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेत उदयास येत आहे.

अशा कर्तृत्ववान नेतृत्व आणि वक्तृत्वाने सजलेल्या निष्कलंक नेत्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदाची संधी दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, खासदार, डॉ. भागवत कराड, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, गणेश लोखंडे, सुनील मिरकर, दिलीप दाणेकर, मकरंद कोर्डे, अशोक गरुड, राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे, पुष्पाताई काळे, गजानन राऊत, अरुण काळे, सुनील काळे, जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुढाळ, कैलास काळे, संजय डमाळे, कैलास जंजाळ,मनोज मोरल्लु, किरण पवार, कमलेश कटारिया, गणेश भूमकर आदींनी अभिनंदन केले.

राजकारणाच्या घडामोडी व पडद्यामागील किस्से पाहण्यासाठी खालील Youtube चॅनल ला Subscribe करा

https://www.youtube.com/channel/UCIKbFf3BKhQoU1SkvI5xfxw

बुधवार, २४ जून, २०२०

भारत-चीन युद्धाची शक्यता आहे का? होय शक्यता आहे. कसे ते वाचा


भारत चीन युद्धाची शक्यता आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. नक्कीच शक्यता आहे.

भारत-चीन किंवा भारत-पाक अणुयुद्ध होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. जगातील कोणताही देश किंवा अतिरेकी संघटना अणुबॉम्ब चा वापर कधीही करणार नाही. जगाच्या पाठीवर कुठं ही फक्त दोन सामान्य क्षमतेचे अणुस्फोट झाले तरी सत्तर टक्के जगावरील ओझोन थर नष्ट होईल ह्याची जाणीव जिनपिंग पासून इमरान खान पर्यंत आणि हाफिज सईद पासून आयसिस किम झोन्ग पर्यंत सर्वाना आहे (काही उथळ लोकांना नाही तो भाग वेगळा!).

भारत चीन संघर्षात भारताला न भरून येणारे नुकसान होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. आज फक्त तंत्रज्ञान सोडले तर बाकी सर्व बाबतीत आपण चीन समोर तुल्यबळ आहोत आणि निर्धाराच्या बाबतीत चीनच्या शतपटीने पुढं आहोत.

भारत महासत्ता बनेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. महासत्ता शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. जागतिक राजकारणात आपला दबदबा आणि वर्चस्व राखणे ही महासत्ता असण्याची चीन व रशिया
ची व्याख्या असेल तर ह्यानुसार भारत २०२४-२५ पर्यंत जगात महासत्ता असेल.

येणारा काळ सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी थोडा अडचणीचा असू शकतो का? ह्याचे उत्तर होय असे आहे. सगळे जग अडचणीत आहे. त्यात आपल्या देशासमोर काही जुने वाद व प्रश्न तोंड काढून उभे राहिल्याने ते कायमचे मिटवायचे असतील तर आपल्या सर्वांना पुढील किमान आठ महिने थोडी कळ सोसावी लागेल.

भारतीय लष्कर पाकिस्तान किंवा चीन सोबतच्या संघर्षासाठी तयार आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. भारतीय लष्कर कायमच सर्व गोष्टींसाठी तयार असते. पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशांच्या सोबत आपल्या लष्कराची तुलना करून हा भारतीय लष्कराचा अपमान ठरेल.

भारत चीन व्यापार पूर्णपणे बंद होऊ शकतो का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. अर्थात सरकार अतिशय जबरी कर लावून चिनी उत्पादने महाग बनवू शकते. त्यात सर्व भारतीय नागरिकांनी जर चिनी उत्पादनांच्या वर बहिष्कार घालायचे ठरवले तर मग हा व्यापार अगदी नगण्य बनून जाईल ज्याचा चीनला मोठा आर्थिक फटका बसेल.

रामदेव बाबांच्या बहुचर्चित कोरोनील ह्या कोरोनावरील औषधावर शंका घेणे योग्य आहे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. कोणतेही औषध प्रमाणित झाल्याशिवाय बाजारात येत नाही. रामदेव बाबांच्या औषधाची किंमत सहाशे रुपये आहे तर इतर कंपन्यांच्या समांतर औषधाची किंमत दहा हजारांच्या वर जाते. औषध विक्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा आणि वर्चस्व असताना रामदेव बाबांनी भारताचा झेंडा अतिशय धाडसी पणे रोवला आहे ह्याचे खरे तर कौतुक असायला हवे.

चीन चर्चेच्या आडून युद्धाची तयारी करतोय का? ह्याचे उत्तर होय असे आहे. गेल्या तीन दिवसात चीनने कुणाचाही अधिकृत भूभाग नसलेल्या सीमेवरील जमिनीवर सगळे करार मोडून आपले बंकर व सशस्त्र तळ बनवायला सुरुवात केलीय.

चीन भारता आधी जपान वर हल्ला करेल का? ह्याचे सध्याच्या घडीस नाही असे उत्तर आहे.हिरोशिमा नागासाकी घटने नंतर अमेरिकेने एका कराराद्वारे जपानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे.जपान वर हल्ला हा थेट अमेरिकेवर हल्ला समजला जाईल. जपान व अमेरिका अतिप्रगत देश असल्याने चीन ते पाऊल उचलायच्या आधी दहा वेळा विचार करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत ह्याचा अर्थ त्यांनी माघार घेतलीय असा घ्यायचा का? ह्याचे उत्तर नाही असे आहे.नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा शांत राहिले तेव्हा-तेव्हा उत्तरात सर्जिकल तसेच हवाई हल्ले झाले आहेत. मोदी कृतीने उत्तर देण्यावर विश्वास ठेवतात.

१९६२ च्या युद्धात चीन ने भारताला हरवलेले आहे. जसा भारत १९६२ चा राहिला नाही तसेच चीन ही राहिला नाही हे आपण लक्षात घ्यावे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. १९६२ ला ही आपण चिनला हरवू शकत होतो. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणून चीनने कसलीच सूचना न देता सरळ आक्रमण केले.

पाकिस्तान ह्या कठीण समयी भारतावर हल्ला करेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. पण ती संधी भारत सरकार पाकिस्तानला देणार नाही. भारताने पाकिस्तान सीमेवर याआधीच आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात आहेत ज्याची पाकिस्तानला कल्पना आहे त्यामुळे पाकिस्तान सध्या बघ्याची भूमिका घेईल.

रशियाची येत्या काळात भारत विरोधी भूमिका असेल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. रशिया हा भारत व चीन असे दोघांचाही मित्र असला तरीही रशिया निवड करायची वेळ येईल तेव्हा निसंदिग्ध पणे भारताची निवड करेल. ती का करेल ह्यावर पुढच्या लेखात सविस्तर लिहितो.

मी काही रक्षातज्ञ वगैरे नाही पण माझे एक मार्गदर्शक रक्षा तज्ञ आहेत. चीन सोबत माझ्यासह आमच्या व्यावसायिक साखळी चे व्यावहारिक संबंध होते त्यामुळे चीन विषयी पूर्ण नसली तरी किमान माहिती व अभ्यास मात्र माझा निश्चितच आहे.अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा साध्या भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

जय हिंद
लेखक : रोहित पुंक

रविवार, १४ जून, २०२०

भारत विरोधी भूमिकेमुळे नेपाळी सरकार विरुद्ध जनतेत रोष नकाशावरून देशभरात निदर्शने


काठमांडू : नेपाळी सरकार देशात अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपले अपयश झाकण्यासाठी व आपली खुर्ची वाचवण्यासाठी नवीन नकाशामध्ये भारतातील तीन क्षेत्रे समाविष्ट करून ती नेपाळची अस्मिता व राष्ट्रवादाचा मुद्दा बनविला आहे.

नेपाळच्या नागरिकांचा या गोष्टीला विरोध दिसून येत आहे. बेरोजगारी आणि कोरोनाचा सामना करण्यास असमर्थ ठरलेले ओली सरकार या सर्व बाबींवरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी भारताशी संबंध बिघडविण्याचे काम सरकार करीत असल्याचे जनतेला मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात सुमधुर संबंध आहेत. आता नेपाळच्या नवीन नकाशावरुन जनता त्यांच्याच सरकारविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे.

राजधानी काठमांडू आणि नेपाळमधील इतर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन तोडून लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निषेध सुरू केला आहे. केपी शर्मा ओली यांचे सरकार त्यांच्याच घरात या निदर्शनांनी घेरले गेले आहे. पंतप्रधान म्हणून केपी शर्मा यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या पक्षातील गटबाजीही शिगेला पोहोचली आहे. कोरोनाविरूद्ध युद्धात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केपी ओली शर्मा सरकारला होत आहे. विरोधी पक्ष सरकारला कोरोना युद्धात होणाऱ्या खर्चाचा हिशोब मागत आहे.

या निदर्शनाबद्दल सरकारने संताप व्यक्त केला आहे, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी शुक्रवारी रात्री मीडियाच्या माध्यमातून जनतेने हे प्रदर्शन थांबवावे असे आवाहन केले. नेपाळच्या जनतेला त्यांनी आवाहन केले की अशा वातावरणात जेव्हा नवीन नकाशाला घटनात्मक दर्जा देण्याची तयारी चालू असताना नागरिकांनी प्रदर्शन करू नये. यामुळे नेपाळबद्दल जगभरात चुकीचा संदेश जात आहे.

शुक्रवार, १२ जून, २०२०

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान गरीब कुटूंबाला दिला मदतीचा हात

सिल्लोड : भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटूंबाला मदत करताना. 
औरंगाबाद, ता. १२ : भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले कोरोणाच्या जागतिक महामारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे सुनील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वृक्षारोपण करताना भाजपचे नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर पाटील मोठे, इद्रिस मुलतानी, विनोद मंडलेचा, कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू, मधुकर राऊत आदी
कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेल्यामुळे सिल्लोड शहरातील गोरगरीब धुणीभांडी करणाऱ्या 37 महिलांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य किराणा सामानाची किट गहू, तांदूळ, साखर, तेल, दाळ, शेंगदाणे, मिठ, मसाला या घरगुती साहीत्यांसह सॅनिटायजर व मास्क चे वाटप सोशल डिसटिंगचे पालन करून करण्यात आले. वाढदिवसानिमित्त स्वतः सुनील मिरकर यांनी रक्तदान करून उद्घाटन केले. सिल्लोड शहरातील आरएल पार्क येथे  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील बनकर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी, भाजपा शहराध्यक्ष विनोद मंडलेचा, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारिया, नगरसेवक मनोज मोरेल्लू, भाजयुमो शहराध्यक्ष मधुकर राऊत, माजी पंचायत समिती सदस्या सौ. वृषाली सुनिल मिरकर यांच्यासह तालुका व शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वत:च्या वाढदिवशी रक्तदान करताना सुनिल पाटील मिरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी.

रक्तदान शिबिरात स्वतःच्या वाढदिवशी रक्तदान करुन एक आदर्श घालुन दिला. यावेळी नितीन शिंगारे, महेश खैरे, अजय नेमाने, रोहित गवते, संतोष वानखेडे, ऋषिकेश लुटे, अक्षय खंडाळे, तुषार इंगळे, आनंद शेळके, संदीप इंगळे, आकाश आरके, श्रावण दुधे, संदीप कौसल, अमोल कारले, आजिनाथ काकडे, उदयकुमार देशमुख, रवी जाधव, आकाश कुमावत, प्रवीण ढाकरे, योगेश साळवे, नारायण पुरी, स्वप्नील शिंगारे, आशिष कर्नावट, योगेश सोनवणे, राहुल राऊत, योगेश पवार, ईश्वर कर्नावट, विशाल मुरकुटे, अक्षय सूर्यवंशी, लक्ष्मण गोरे, संजय गारखेडे, रोहित मिरकर, प्रवीण मिरकर, राहुल राऊत, स्वप्नील साळुंके, सचिन साळवे, सचिन जाधव, राहुल मिरकर, ऋतिक आहेर, सचिन मिरकर, प्रकाश झलवार, गौरव वराडे, अज्जू शहा, अतुल साळवे, रवी जाधव, पवन सोनवणे आदी दात्यांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढीने रक्त संकलन केले.

बुधवार, १० जून, २०२०

भारतीय वायुदलाच्या विमानांच्या कराची शहरावरुन घिरट्या? पाकचा इन्कार, बालाकोट एअर स्ट्राईकची आठवण ताजी

कराची : भारतीय वायुदलाच्या विमानांनी काल मध्यरात्री पाकीस्तानच्या कराची शहरावरुन घिरट्या मारल्यामुळे संपुर्ण कराची शहराचा वीजपुरवठा खंडीत करुन कराची शहर अचानक ब्लॅक आऊट करण्यात आले. त्यानंतर पाकीस्तानी विमानांनी कराची शहरावर गस्त घातल्यामुळे पाकीस्तानी सैन्यांसह नागरीकांची झोप उडाली आहे.

याबाबत माहीती अशी की, पाकिस्तानच्या कराचीमध्ये एक अफवा पसरली की काल मध्यरात्री कराची शहरावरुन काही विमानांनी घिरट्या घातल्या त्यामुळे तेथील सैन्याची झोप उडाली आहे. त्यानंतर संपूर्ण कराची शहराची वीज तोडण्यात आली व पाकीस्तानची सैनदलाची विमानांनी काही काळ शहरावरुन गस्त घातल्याचे समजते. यामुळे पाकीस्तानी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बालाकोटची आठवण ताजी

भारताने पाकीस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी पाक अधिकृत काश्मिरमधील बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी सुद्धा काहीतरी घडल्याची पहीली बातमी पाकीस्तानमधून आली होती. त्यावेळी पाकीस्तानने अशा स्ट्राईकचा सुरवातीला इन्कार केला व नंतर कबुली देताना जंगलातील काही झाडे कोसळल्याची प्रतिक्रिया देऊन झालेली नामुष्की झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीप्रमाणे आतासुद्धा भारताकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र केवळ एका अफवेवर विश्वास ठेऊन पाकीस्तानने कराची शहराचा वीजपुरवठा खंडीत करुन ब्लॅकआऊट केल्यामुळे काहीतरी घडल्याचा सुर नागरीकांमध्ये दिसुन येत असुन भीतीचे वातावरण पसरले आहे

कराची शहर

पाकिस्तानमध्ये या अफवांमुळे तेथील सैन्य आणि सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. संपूर्ण कराची शहर ब्लॅकआउट करण्यापर्यंत परिस्थिती आल्याची माहीती मिळते. वास्तविक सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की काही अज्ञात लढाऊ विमान कराचीवरून उड्डाण करतांना दिसत आहे. तेव्हाच काय, पाकिस्तानची लढाऊ विमानही हवेत फिरताना दिसले आणि शहरातील वीज खंडित झाली. कराचीवरून काही अज्ञात लढाऊ विमान उड्डाण घेतल्याच्या बातमीनंतर संपूर्ण शहर काळोखात बुडाल्याची दुजोरा नसलेली बातमी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. हवेत उड्डाण करतानाच्या लढाऊ विमानांचे व्हिडिओ सुद्धा पाकिस्तानी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेअर केले जात आहेत. कराचीच्या स्थानिक नागरीकांनी सुद्धा याबाबत सोशल मीडियावर अनेक ट्विट केले आहेत. या बातमीनंतर कराचीच्या आकाशात पाकिस्तानी हवाई दलाची विमानंही उडताना दिसले. मात्र पाकिस्तानने अशा कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिला नाही. पाकिस्तानात कथित लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याच्या वृत्तानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुख्य घडामोडी

  • पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की काही अज्ञात लढाऊ विमान कराचीवरून उड्डाण करतांना दिसत आहे.
  • अफवावरून पाकिस्तान हादरला
  •  संपूर्ण कराची शहर वीज खंडित करण्यात आला.
  • काही काळ पाकिस्तान एअर फोर्सची विमानं हवेत उडताना दिसली.

मंगळवार, ९ जून, २०२०

राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकामार्फत सणसणीत प्रतिउत्तर

 
मुंबई  : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर एका शिवसैनिकाची पोस्ट टाकून उत्तर दिले आहे. भाजप नेते राजनाथ सिंह यांनी काल शिवसेनेवर आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली एक सर्कस चालू आहे. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. निवडणुकीच्या अगोदर भाजप आणि शिवसेना एकत्र लढले परंतु निवडणूकीनंतर शिवसेनाला सत्तेचा मोह झाला. सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. भाजपाने हा धोका पचवला. आम्ही धोका पचवणाऱ्यांपैकी आहोत धोका देणारे नाही. धोका देणे ही भाजपाची संस्कृती नाही.

याला उत्तर देताना अक्षय काळे या शिवसैनिकाची पोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केली पोस्टमध्ये म्हटले आहे की, आता राजनाथ सिंह यांनी राजकारण चालू केलंच आहे तर आम्ही सुद्धा काही बोलू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्रात सर्कस चालू आहे? कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाविकासआघाडीचे सरकार खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करत आहेत. योग्य त्या उपाययोजना करून कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी जिद्दीने लढत आहेत आणि राजनाथ सिंह यांना ही सर्कस वाटते? हजारो लोक कोरोनाशी झुंज देत आहेत, महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि असे हजारो जण जिवाचं रान करत आहेत ही गोष्ट राजनाथसिंह यांना सर्कस वाटते? असं असेल तर तुमच्या विचारांना साष्टांग दंडवत! राजकारण करायचं असेल तर आम्ही देखील बोलू शकतो हे विसरू नका.

केंद्र सरकारने काय केलं? टाळ्या वाजवायला लावल्या, थाळ्या वाजवायला लावल्या, नंतर दिवे लावायला लावले. देशात कोरोनाचा पहिला बाधित रूग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकारने नमस्ते ट्रम्प कार्यक्रम ठेवला. कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती का? बरं ठीक आहे एकवेळ असं समजू की राज्यातील आकड्यांना राज्य सरकार जबाबदार आहे. मग देशाचा कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांच्या आसपास गेला त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे असंच म्हणावं लागेल? इटलीमध्ये कोरोनाचे अडीच लाख रूग्ण झाले तेव्हा तिथले पंतप्रधान अक्षरशः रडले. आपल्या देशात दोन लाख ७० हजार रूग्णसंख्या झालेली असताना देशाचे पंतप्रधान किंवा त्यांचा पक्ष बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तयारीला लागला? लाज वाटत नाही का?

बरं दुसरा मुद्दा शिवसेनेने भाजपला धोका दिला? आता हा विषय खुप जुना झाला आहे आणि याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही पण राजनाथ सिंह हे राज्यात त्यांचा पक्ष विरोधी पक्षात बसल्याच्या धक्क्यातून आत्ताशी सावरले आहेत वाटतं त्यामुळे एवढ्या उशीरा प्रतिक्रिया देत असावेत. तर बोलायचा मुद्दा हा आहे की कुणी कुणाला धोका दिला हे महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने उघड डोळ्यांनी बघितलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी समसमान जागावाटप आणि समसमान अधिकार हा शब्द देऊन ऐनवेळी कुणी दगाबाजी केली हे सर्वांनी बघितलं आहे. समसमान जागावाटप तर केले नाहीच उलट शिवसेना उमेदवारांच्या विरोधात ४० ठिकाणी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आणि त्या बंडखोर उमेदवारांना छुपी ताकद दिली. बरं तुम्ही एवढ्यावरच थांबले नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने तुमचा दगाबाजीचा प्लॅन फसला आणि तुमची गाडी १०५ वर थांबली. युतीची पहिली बैठक बसत नाही तोपर्यंतच देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाच वर्ष मुख्यमंत्री मीच राहील. चंद्रकांत पाटील म्हणाले की गृहमंत्री, महसूल मंत्री, अर्थमंत्री, नगरविकास खाते हे आमच्याकडेच राहतील? दिलेला शब्द न पाळुन शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला म्हणून शिवसेनेने इतर पर्यायांचा विचार केला.

राजनाथ जी, तुम्ही सर्वात मोठं हास्यास्पद बोललात की भाजप धोका पचविणाऱ्यांपैकी आहे धोका देणाऱ्यांपैकी नाही. तुमच्या या वाक्यावर लहान मुल सुद्धा हसेल. शिवसेनेला सत्तेचा मोह झाला? तुम्ही धोका देत नाही? मग भल्या पहाटे अजित पवारांसोबत गुपचूप जाऊन शपथविधी सोहळा उरकला ते काय होतं? अख्खी कॉंग्रेस राष्ट्रवादी रिकामी करून स्वत:च्या पक्षात सामावून घेतली आणि तुम्ही धोका देत नाही म्हणता? बरं शिवसेनेला सत्तेचा मोह झाला होता तर तुम्हाला झाला नव्हता का? तसं होतं तर द्यायचं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पद काय बिघडणार होत? २५ वर्षांपासूनचा मित्रपक्ष होता, १० वर्षातले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला का नकार दिला?

कसंय ना राजनाथ जी, तुम्हाला फक्त आणि फक्त सत्ता हेच एकमेव ध्येय दिसतं, तुम्ही काळाबाजार करून आमदार फोडून किती राज्यात काय काय लफडे केले ते उभ्या देशाने बघितले आहेत. त्यामुळे तुम्ही दगाबाजी वगैरे या गोष्टी बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. ते म्हणतात ना 'सौ चुहे खाके बिल्ली चली हे को' अगदी तसं. राहिला विषय महाराष्ट्राचा तर शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करने, गृहीत धरने, फडणवीसांचा सत्तेचा मोह, मी पणा, अहंकार, सत्तेची मस्ती या गोष्टींमुळे तुम्ही विरोधात बसले आहात आणि हो धोका देणं शिवसेनेच्या रक्तात नाही. आजपर्यंत अशी एकही घटना घडली नाही ज्यात शिवसेनेने मित्राला धोका दिला. उलट महाराष्ट्रात शिवसेनेला २५ वर्ष साथ दिलेल्या मित्राने धोका दिला. त्यामुळे विनाकारण राजकारण करू नका. महाराष्ट्र राज्यात महाविकासआघाडीचं नवीन सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. वेगवेगळ्या सर्वेमधून आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मिळणाऱ्या पाठिंब्यातुन जनतेलाही हे सरकार किती योग्य वाटते आहे ते दिसुन आलेलं आहे. राज्य सरकार कोरोनाशी खंबीरपणे लढत आहे. तुम्ही तुमच्या केंद्र सरकार कडे लक्ष द्या आणि निवडणुकींच्या प्रचार बाजूला ठेवून कोरोनाच्या विषयावर लक्ष द्या.

अशाप्रकारे पोस्ट मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे.

शेतकऱ्यांचा शेतीमाल लालपरी पोचविणार थेट बाजारपेठेपर्यंत सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथुन शुभारंभ

एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथून एस. टी. महामंडळाच्या मालवाहतुक ट्रकच्या वाहतुकाचा शुभारंभ करताना भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, आगारप्रमुख प्रविण भोंडवे आदी.

औरंगाबाद : शेतकरी व व्यापारी वर्गाला शेतमाल बाजार पेठेपर्यंत पोचविणे आता सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शेतीमाल वाहतूक ट्रकची सुरुवात रविवारी (ता. सात) सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांच्या हस्ते या मालवाहतुक ट्रक वाहतुक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

 

या वेळी आगारप्रमुख प्रवीण भोंडवे, स्थानक तथा मालवाहतूक प्रमुख व्ही. बी. चव्हाण, वाहतूक निरीक्षक जि. ए. गवारे, वाहतूक निरीक्षक यस. एल. भापकर, वाहतूक नियंत्रक बाबासाहेब साळुंके, वाहतूक नियंत्रक राहुल राऊत यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत होती. तालुक्यातून बोरगाव कासारी ते शेकटा पहिली शेतीमालाची खेप जाणार आहे. एस. टी. महामंडळ याचे भाडे अंदाजे ४८ रुपये प्रति क्विंटल आकारणार असल्याने वाहतुकीचा खर्च कमी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेती माल बाजारपेठेपर्यंत पोचविणे सोयीचे होणार आहे. व्यापारी वर्गांना सुद्धा याचा लाभ घेता येणार असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीचा भाव देऊ शकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात महामंडळालाही भाड्याच्या स्वरूपात फायदा होईल. या मालवाहतुकीच्या निर्णयांमुळे व्यापारी व शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी महामंडळाच्या ट्रकमध्ये शेतकऱ्यांचा माल सुरक्षीत राहील याची ग्वाही देतांनाच महामंडळाच्यावतीने माल वाहतुक सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहे. याचा सर्वच शेतकरी वर्गांसह छोटे मोठ्या व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण कोंडवे यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाला एस. टी. महामंडळाचे चालक भारत खरोडे, सुधाकर गोराडे, संजय आघाडे, रामभाऊ मगर वाहक पोपट वाढेकर आदी कर्मचाऱ्यांसह शेतीमाल व्यापारी सोपान गोराडे, माजी उपसरपंच दादाराव ब्राह्मणे, शेतकरी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

पिकवणे सोपे पण विकणे अवघड अशा परीस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल वेळेवर व सुलभरित्या बाजारपेठेपर्यंत पोचविणे जिकरीचे असल्यामुळे जागेवरच व्यापाऱ्यांना कमी भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते अशावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल गावातुन थेट बाजार पेठेपर्यंत किंवा तत्सम ठिकाणी पोच करणार असल्याने शेतकऱ्यांची दोन पैशाची बचत होऊन शेतमाल थेट बाजारपेठेपर्यंत जाणार असल्याने याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. एस. टी. महामंडळाने घेतलेल्या या मालवाहुतीकीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधुन कौतुक होत आहे.

शनिवार, ६ जून, २०२०

मुंबईची अवस्था पाहून मुंबई सोडून नांदेड गाठले-अशोक चव्हाण


मुंबई : मुंबईत कोरोनाची अवस्था पाहून मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेत नांदेडला जाण्याचा निर्णय  घेतला होता असे काँग्रेसचे वरीष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार केल्यानंतर बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना चार जुनला सुट्टी देण्यात आली.

कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते व सार्वजनिक बांधाकाम मंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडला कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर ते उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला आले होते. त्यांनतर त्यांनी सांगितले की, मुंबईला माझ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी विचलित झालो व ही परीस्थिती कुठपर्यंत पोचली. मुंबईत ज्या गतीने कोरोना वाढत चालला आहे त्यामुळे नांदेडला स्वतःच्या घरीच थांबाव यासाठी 19 जूनला मुख्यमंत्र्यांना सकाळी भेटून मी मुंबई सोडून नांदेडला जाण्याचा निर्णय घेतला व नांदेडला गेल्यानंतर मी चार दिवस होम कॉरंन्टाईन झालो. त्यानंतरही मला कोणतेही लक्षणे दिसत नव्हते ताप, सर्दी, खोकला यासारखे काहीही नव्हते मात्र मी फॅमिली डॉक्टरांना माझ्या नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी मला तपासण्या करुण घेण्याचा सल्ला दिल्यानंतर तपासण्या यावेळी एक्सरे काढले त्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार करण्यात आले.

यापुढे सर्वांनी खुप काळजी घ्यावी

मला या अकरा दिवसाच्या काळात खुप काही शिकायला मिळाले. आपण या गोष्टी दुसऱ्याला सांगतो बाहेर पडू नका घरीच थांबा मात्र जेव्हा स्वतःवर ही वेळ येते तेव्हा कळते. त्यामुळे सरकार देत असलेल्या सुचनांचे पालन करावे हा आजार मी खुप जवळून पाहीला आहे. त्यामुळे यापुढे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. काम करु नका असे करता येणार नाही. यापुढे खुप काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात नांदेडमध्ये एकही रुग्ण नव्हता तेव्हा अनेकजण माझे अभिनंदन केले. पण मला काळजी वाटत होती. पुढे काय होते हे सांगता येत नाही. नांदेडला स्थानिक नागरीकांमधून ही साथ पसरली नाही असेही ते म्हणाले.

कोरोनावर केली मात

कोरोनाच्या काळात मंत्री अशोकराव चव्हाण मतदारसंघात खुप फिरुण गरजवंताना मदत करणे असो की मुंबईत विविध बैठका असो त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारे अशोक चव्हाण हे राज्यातील दुसरे मंत्री आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहीकेतून नांदेडहून मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबईत येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारानंतर अकरा दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली आहे. दोन दिवसापुर्वी म्हणजेच चार जुन रोजी त्यांना कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रुग्णालयातून स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभाग


रुग्णालयात असतानाही अशोक चव्हाण हे एक्टीव्ह मोड मध्येच पहायला मिळाले यावेळी त्यांनी केलेल्या व्हिडीओत ते ते म्हणाले की, मित्र हो नमस्कार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाद्रा यांनी जी स्पीकअप इंडीया मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात मी सहभाग नोंदवत आहे. कोट्यावधी देशवासियांचे जे मनोगत आहे. ज्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीकोनातून आज मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधून कोरोनाशी लढा देत असताना स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभागी होत असल्याचं जाहीर करतो. यावेळी त्यांनी त्यांचा तो व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला होता.

शुक्रवार, ५ जून, २०२०

Corona update : जिल्ह्यात आज ५९ रुग्णांची वाढ, ६०९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, ता. ५ : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (ता. पाच) सकाळी ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ झाली आहे. यापैकी ११२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ९३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ६०९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज सकाळी बाधित रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या) : भारतमाता नगर (०१), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (०१), न्यू कॉलनी, रोशन गेट (०१), भावसिंगपुरा (०१)‍, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (०१), बेगमपुरा (०१), चिश्तिया कॉलनी (०१), फाझलपुरा (०१), रेहमानिया कॉलनी (०१), गांधी नगर (०१), युनूस कॉलनी (०२), जुना मोंढा, भवानी नगर (०१), शुभश्री कॉलनी, एन सहा (०१), संत ज्ञानेश्वर नगर, एन-९ (०१), आयोध्या नगर, एन सात (०७), बुडीलेन (०३), मयूर नगर, एन अकरा (०१),विजय नगर, गारखेडा (०३), सईदा कॉलनी (०१), गणेश कॉलनी (०१), एसटी कॉलनी, फाजलपुरा (०१), रोशन गेट परिसर (०१), भवानी नगर, जुना मोंढा (०१), औरंगपुरा (०२), एन आठ सिडको (०१), समता नगर (०४), ‍मिल कॉर्नर (०२), जवाहर कॉलनी (०३), मोगलपुरा (०२), जुना मोंढा (०१), नॅशनल कॉलनी (०१), राम मंदिर, बारी कॉलनी (०१), विद्यानिकेतन कॉलनी (०१), देवडी बाजार (०१), एन सात सिडको (०१), एन बारा (०१), आझाद चौक (०१), टी.व्ही. सेंटर एन अकरा (०१), कैलास नगर (०१), इतर ठिकाणी (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १९ महिला आणि ४० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीत एका महिलेचा मृत्यू

 शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय गरोदर महिलेस २८ मे रोजी घाटीत दुपारी चार वाजता भरती करण्यात आले होते व त्याच दिवशी प्रसूतीनंतर त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल २९ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनीचे कार्य अतिशय कमी असल्याने त्यांना डायलिसिस देण्यात आले. परंतू त्यांच्या शरीरातील प्राण वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना ४ जून रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ७२ तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ९३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

तीन दिवसांपासून रुग्णामध्ये दुपटीने वाढ

काही दिवसांपूर्वी बधितांची संख्या दररोज २५ च्या आसपास होती त्यावेळी संक्रमण रोखण्यात यश येत असल्याचे दिसून येत असतानाच अचानक तीन दिवसांपासून हा आकडा दुपटीने वाढायला लागला आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख